Banner

इंजिनीयर कि माणूस ? (भाग-१)


त्यावेळी मी इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकत होतो. आमच्या गावाकडची जत्रा होती. त्यामुळे मला गावी जावे लागणार होते. घरचे अगोदरच पुढे गेले होते. मी सकाळची एसटी पकडली.

आमच्या गावी म्हणजे कराडला जाण्यासाठीचा रस्ता म्हणजे एकदम हिरवा गार… एस टी मधून बाहेर बघताना खूप आल्हाददायक वातावरण जाणवत होते. जिकडे तिकडे हिरवीगार पिके , ऊस जोमाने डोलत होती. डोंगर-दऱ्या बघताना तर चौथीत वाचलेले इतिहासाचं पुस्तक नजरेसमोर येत होतं. मधूनच एखादा  ट्रॅक्टर ऊस  घेऊन  हळू हळू जात होता.   पावसाळा  तोंडावर  आल्याने वैरण झाकून ठेवण्याचं काम चालू होते.   एकदम निवांत ... शहराची भाग दौड  नाही... छान वाटले.

बघता बघता कराड स्टँड आले. माझं गाव स्टँड पासून आत मध्ये असल्यामुळे मी स्टँड पासून टमटम (सिक्स सिटर) पकडून साकुर्डी फाट्यावर उतरलो. तेथून मला पायीच जावे लागणार होते… पण पोटात कावळे ओरडत होते म्हणून एका हॉटेलमध्ये खायचे ठरवले.

हॉटेल जगदंबा दिसले... जवळच्या नळावर हात-पाय धुऊन मी एका हॉटेलमध्ये गेलो. वडापाव संपवून मी चहा घेतला तेवढ्यात तिथे एक पन्नास-पंचावन्न वर्षाची बाई आली.  डोक्यावर भल मोठ जळणाचं ओझ तिने बाजूला टाकलं.  कुठेतरी एखादा काळा केस ,  कपाळावरती मोठी कूंकुवाची छटा ,  घामामुळे कूंकुवाचा लाल रंग भुवईपर्यत आलेला,  धारदार नाक , तंबाखूच्या मशेरी ने काळवंडलेले दात ,  सूरकुतलेले हात… तिन-चारजोड देऊन हातानेच शिवलेल नववारी लुगड आणि चोळी असा काही तिचा वेश होता.

ती आत आली आणि  त्या  सुरकुतलेल्या  हातांनी उभ्याउभ्याच दोन ग्लास पाणी  रिचवला आणि हॉटेलच्या पोरीला विचारलं "नुस्तच कालवण मिळल का गं बाई ?  माझ्याकडं भाकर हाय…".   तिचा होकार मिळताच काळपट फडक्यातून त्या बाईन शिळी भाकर काढली आणि दिलेल्या कालावणावर अधाशिपणान खाऊ लागली.

मी विचार करायला लागलो.. आपण पैसे द्यावे का ? हिला कुणीच नसेल का ? आणि असेल तर अशी वेळ का यावी तिच्यावर ? इतक्यात तिची भाकरी संपण्याच्या आत ती हॉटेलवाली  मुलगीच   म्हणाली.. "आजी मिसळपाव घ्या.. पैसे नाही घेणार."

.."पोरी आज खाईन पोटभरून पण उदया  ?"
... "तुम्हाला मुलबाळ नाही का ?"
त्यावर आजी म्हणाल्या, "तसं नाय काय.. पोरगा मोठा सायब हाय …परदेशाला इंजीनियर हाय.. पण त्याला येळच नाही."

कानाखाली कोणीतरी जोराची चपराक मारावी आणि त्याचा आवाज मेंदूपर्यत घुमावा तसे हे शब्द माझ्या कानावर पडले आणि विचारांच काहूर माजल.  माणूस इतका बदलतो का...?  आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेणा-या या माऊलीची त्याला क्षणभरही आठवण येत नसेल का ? आणि येत असेल तर ही जबाबदारी त्याने का झटकावी ?

सगळच अनुत्तरीत होत...  माझा चेहरा खाली घालूत मी आता विचार करत होतो इतक्यात माझ्या पाठीवर तोच थरथरता हात फिरला.  मी वरती पाहील तर तिच बाई..

मला म्हणाली, " इतका विचार करु नकोस बाबा. तुझ्या आई-बापाला निट जप म्हणजे झाल…"

मग तर मेल्याहून मेल्यासारखं झालं मी आता फक्त रडायचाच बाकी होतो.  कारण एका हातात माझ पूर्ण अंतरंग त्या माऊलीन वाचलं होतं...

पण आम्हाला आमच्याच आई-वडीलांच थोडस दुःख सुद्धा कधी जाणता येत नाही.  जिवनाच्या सचोटीत एवढं शिक्षण घेऊनही आम्ही अगदीच अडाणी वाटतो यांच्यासमोर… कुठ शिक्षण घेतल असेल यांनी ??

सेटलमेंट ,  न्यू जॉब  ,  इन्क्रिमेंट, प्रमोशनच्या घोळात आम्ही ही आमची माणसं कुठ हरवुन बसतो आम्हालाच कळत नाही.  डोकं जड झालं होतं ...  मी उठलो आणि चालू लागलो.
शेजारच्याच  जिल्हापरिषदेच्या शाळेत मास्तर मूलांना विचारत होते  “मुलांनो ...  आपण काय शिकलो ?”.

मी मनाशीच उत्तर दिलं...  आयुष्यात चांगला इंजिनिअर होता आलं नाही तरी चालेल… पण चांगला जबाबदार माणूस  मात्र  जरुर व्हायच !!
गावाकडचा रस्ता कोण का जाणे मला नेहमीपेक्षा लांब वाटतं होता ....

क्रमशः 


Post a Comment

3 Comments